पुणे जिल्ह्याकरिता कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा मोठा साठा उपलब्ध करून द्या
![Construction workers will get home sets](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/mla-laxman-jagtap.jpg)
- आमदार लक्ष्मण जगताप यांची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी
पिंपरी / महाईन्यूज
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील चाचण्यांचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणावर मनपामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. उद्योगनगरीत कोरोना संकट पुन्हा तीव्र बनले असून त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात विविध वस्त्या व गृहनिर्माण संस्थेत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. त्याकरिता मुबलक प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धतता होणे अत्यंत गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणाकरिता प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा भासत आहे. राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्राकडून पुणे जिल्ह्याकरिता कोरोना प्रतिबंधक लसींचा कोठा वाढवून मिळणेबाबत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून पुणे जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने लस घेणे सोयीचे होईल.
तसेच, पुणे जिल्ह्यातील रूग्णालयाकरिता केंद्र शासनाकडून व्हेंटीलेटरचा वेळेत पुरवठा करणेबाबत संबंधित यंत्रणेशी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.