पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात
वित्त विभागाच्या मूळ सेवेत रुजू होण्याचे आदेश

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले राज्यकर उपायुक्त प्रदिप जांभळे पाटील यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आली आहे. आणि त्यांची सेवा त्यांच्या मुळ प्रशासकीय विभागाकडे म्हणजेच वित्त विभागाकडे परत पाठविण्यात आली आहे.
नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन आदेशानुसार जांभळे पाटील यांची २२ सप्टेंबर २०२२ रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली होती.त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या २८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या आदेशानुसार पात्रता तपासून नगर विकास विभागाने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत आणखी दोन वर्षांसाठी वाढविली होती.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! ‘या’ शेतमालांची हमीभावाने शासकीय खरेदी, ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ
मात्र जांभळे पाटील यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाकडे प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज नगर विकास विभागाने त्यांची प्रतिनियुक्ती समाप्त करून सेवा वित्त विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचा आदेश जारी केला आहे
हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने उप सचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी जारी केला आहे.




