Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

थेरगाव मनपा शाळेने सादर केलेले “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या विषयावरील इन्स्टॉलेशन ठरले लक्षवेधी

पिंपरी | मुंबई येथील प्रतिष्ठित काळा घोडा फेस्टिव्हल २०२६ अंतर्गत आयोजित चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली होती. या विभागातील विजेत्या शाळांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

थेरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या विषयावर सादर केलेले इन्स्टॉलेशन परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील वापर करून मानवी मनाचा वेग, भावनांची गुंतागुंत आणि आत्मसंयम यांचे प्रभावी प्रतीकात्मक दर्शन या मॉडेलमध्ये घडवण्यात आले आहे. हे मॉडेल सर्वोत्तम ठरले असून थेरगाव शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यशामुळे मनपा शाळांनी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अनेक नामांकित व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला होता. अशा स्पर्धात्मक वातावरणात महापालिकेच्या शाळेने मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, कल्पकता आणि मार्गदर्शनाची पावती देणारे ठरले आहे.

हेही वाचा     :            Parliament Budget Session : लोकसभेत गोंधळ, कामकाज तहकूब; व्यापार करारांवरून विरोधक आक्रमक

या इन्स्टॉलेशनची संकल्पना व निर्मिती कला शिक्षिका मुक्ता पुसाळकर-धोंगडे यांनी केली असून, त्यांना अंशकालीन शिक्षिका स्वाती मदने व दिपाली नवले यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात सानिका पवार, श्रावणी महापुरे, दिपाली पांडगुळे, अनुजा टोमके, प्रिया होळकर, हुमेरा शेख, यशोदा राठोड, किशोरी वाबळे व समिक्षा डींगरे या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर यांच्यासह शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

इन्स्टॉलेशनची कलात्मक मांडणी

‘मानवी विचारांचे रोलरकोस्टर’ या संकल्पनेवर आधारित इन्स्टॉलेशनची कलात्मक मांडणी, प्रतीकात्मकता आणि भावनिक आशयामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये सायकलच्या चाकांमध्ये धावणारा घोडा विचारांची ऊर्जा आणि इच्छाशक्ती दर्शवतो, तर दोरी पकडून उभी असलेली मुलगी आत्मसंयम आणि विवेकाचे प्रतीक ठरते. वेस्ट मटेरियलमधून घडवलेले चेहरे, मानवी आकृती आणि त्रिमितीय रचना जीवनातील संघर्ष, अनुभव आणि मानसिक चढ-उतार अधोरेखित करतात. विचारांवर नियंत्रण ठेवून अनुभवांना योग्य दिशा देण्याचा संदेश देणाऱ्या या इन्स्टॉलेशनमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत मानांकन मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेने राष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता, मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. महापालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता आणि संधी योग्य दिशेने दिल्यास विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देखील सहज यश मिळवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

काळा घोडा फेस्टिव्हलसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून साकारलेली कलाकृती ही त्यांच्या विचारक्षमतेची आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची साक्ष देणारी आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा संधी देत राहणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील.

– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button