पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : आरक्षण सोडतीतील दुरुस्तीनंतर चार जागांमध्ये बदल
आरक्षण सोडतीतील त्रुटी दुरुस्त; प्रभाग १९ आणि ३० मधील चार जागांचे चित्र बदलले

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागांतील चार जागांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आरक्षण सोडतीत तांत्रिक त्रुटी झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयोगाने केलेल्या दुरुस्तीचा थेट परिणाम प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील ओबीसी आणि महिला आरक्षणावर झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या दुरुस्तीनुसार प्रभाग क्रमांक ३० मधील ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली ‘क’ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे. तसेच या प्रभागातील ‘ड’ जागा जी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती, ती आता सर्वसाधारण म्हणून खुली करण्यात आली आहे. या बदलाचा परिणाम प्रभाग क्रमांक १९ वरही झाला आहे. सोडतीत महिलांसाठी राखीव ठरलेली ‘ब’ ओबीसी जागा आता सर्वसाधारण ओबीसी झाली असून ‘क’ सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे.
हेही वाचा : गरिब, अनाथ, वंचित-ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी लढणाऱ्या अनुराधा साळुंके मैदानात!
आयोगाने नमूद केले आहे की, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव असतील परंतु महिलांसाठी राखीव नसतील, अशा प्रभागांमध्ये ओबीसी प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखणे आवश्यक आहे. ही तरतूद प्रभाग ३० मध्ये न वापरल्याने झालेली चूक दुरुस्त करण्यात आली.
या दुरुस्तीमुळे अनेक इच्छुकांच्या गणितात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही संभाव्य उमेदवारांना जागा बदलावी किंवा रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. तथापि, ही दुरुस्ती पूर्णपणे नियमांनुसारच करण्यात आल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. आरक्षणासंबंधी कोणतीही हरकत नागरिक १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निवडणूक विभागाकडे नोंदवू शकतात, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी दिली.
बदलानंतरचे आरक्षण चित्र
प्रभाग क्रमांक १९ : उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क – सर्वसाधारण (महिला)
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३० : दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती (महिला)
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ड – सर्वसाधारण





