पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना जाहीर
![पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना जाहीर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/voting_2017086112.jpg)
- राष्ट्रवादीला प्रभाग रचना अनुकूल ; शिवसेनेलाही ‘फेव्हर’
- भाजपाच्या अनेक नगरसेवकांचे वॉर्ड फुटले
- काँग्रेसची वाट बिकट
पिंपरी |
प्रभाग कसा असेल..यावरून सुरु असलेली उत्कंठा, धाकधूक आज अखेर संपली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारुप प्रभागरचना आज (दि. 1) अखेर जाहीर करण्यात आली. ही प्रभागरचना अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच अनुकूल असल्याचे दिसून येत आहे . भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड फुटले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीला प्रभाग रचना अनुकूल असताना शिवसेनेलाही ८ ते ९ प्रभागात ‘फेव्हर’ मिळाल्याचे दिसत आहे. मात्र या प्रभाग रचनेमध्ये काँग्रेसला पोषक असे वातावरण मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असताना प्रभार रचनेस झालेला उशीर, करोनाची तिसरी लाट आणि ओबीसी आरक्षण या सारख्या मुद्यांमुळे प्रभागरचनेस विलंब लागला होता. अत्यंत उत्कंठा शिगेला पोहोचविणारी आणि इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांचे राजकीय भविष्य ठरविणारी प्रारुप प्रभागरचना महापालिकेकडून आज जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रभागाचे नकाशे व त्यातील समाविष्ट भाग पाहण्यात नागरिक तसेच, इच्छुक दंग झाले होते. अपेक्षेनुसार प्रभाग असल्याने काहींनी आनंद व्यक्त केला तर, प्रभाग तुटल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. प्रभागासोबत एससी व एसटीची लोकसंख्या दिल्याने कोणत्या प्रभागात त्या वर्गाचे आरक्षण पडणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना पाहण्यास अनेकांनी पसंती दिली. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळास भेट दिल्याने ती खूपच मंद सुरू होती. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. एकूण ४६ प्रभाग असून, त्यातील ४५ प्रभाग हे तीन सदस्यांचे व सांगवी प्रभाग क्रमांक ४६ हा चार सदस्यांचा प्रभाग आहे.
2017 च्या निवडणुकीत राज्यातील सत्तेचा फायदा उठवत ज्या पद्धतीने भाजपाने अपेक्षित प्रभागरचना करून घेतली होती, त्याच धर्तीवर राष्ट्रवादीनेही प्रभागरचना करून करून घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतील पॅनल प्रमुख म्हणून समजल्या जाणाऱ्या माजी आमदार विलास लांडे , माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर संजोग वाघेरे , मंगल कदम, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यासारख्या नेत्यांची प्रभाग रचना त्यांना अनुकूल होईल अशी या पद्धतीने करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाकड, थेरगाव, मोशी , यमुनानगर यांसारख्या आठ ते नऊ प्रभागांमध्ये शिवसेनेला देखील राजकीय वाटचाल सोपी होईल या पद्धतीने रचना करण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र यामध्ये काँग्रेस कुठे आहे असा प्रश्न प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय जाणकारांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे भाजपच्या अनेक ठिकाणी प्रभाग फोडले असले तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र प्रारूप प्रभाग रचना आम्हाला अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले आहे.
- सांगवीमध्ये चार नगरसेवक
सन 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून ही प्रभागरचना करण्यात आली असून 139 नगरसेवकांसाठी 46 वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये 45 वॉर्ड हे तीन नगरसेवकांचे असणार असून 1 वॉर्ड हा 4 नगरसेवकांचा आहे. तळवडे हा पहिल्या क्रमांकाचा वॉर्ड हा 40 हजार 767 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. तर या वॉर्डातील अनुसूचित जाती संवर्गाची लोकसंख्या 5 हजार 348 इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 956 इतकी आहे. तर शेवटचा वॉर्ड हा सांगवी असून या वॉर्डाची रचना चार नगरसेवकांसाठीची आहे. या वॉर्डाची लोकसंख्या 46 हजार 979 इतकी असून या वॉर्डातील अनुसूचित जाती संवर्गाची लोकसंख्या 7 हजार 919 इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1303 इतकी आहे. त्यामुळे या वॉर्डातील एक जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार हे जवळपास निश्चित आहे. प्रभागांना मागील निवडणुकीप्रमाणे केवळ क्रमांक दिले आहेत.
- प्रभाग आराखडा पहायला गर्दी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह आठही प्रभाग कार्यालयांमध्ये एकाच वेळी म्हणजे आज (दि. 1) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केला. आज आराखडा जाहीर होणार हे माहित असल्यामुळे इच्छुकांसह नागरिकांनी सर्वच ठिकाणी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक प्रभागाच्या रचनेची स्वतंत्र प्रिंट काढून इमारतीमध्ये चिकटविण्यात आली होती. हा आराखडा पहावयास पावणे दहापासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. आराखडा जाहीर होताच मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले