चिखली ते स्वारगेट बस सुरू करण्याची पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी
![Pimpri Chinchwad Housing Society Federation demands to start Chikhali to Swargate bus](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/pmpml_bus.jpg)
पीएमपीएमएल प्रशासनाला फेडरेशनचे निवेदन
30 ते 35 हजार लोकसंख्येसाठी बस गरजेचे असल्याचे निवेदन
पिंपरी ।प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएलची चिखली ते स्वारगेट बस सुरू करावी, अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने मागणी करण्यात आली असून, याबाबत अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.
फेडरेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली, जाधववाडी , बोऱ्हाडेवाडी , मोशी या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी करण झाले असल्याचे दिसून येत आहे. अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था( सोसायट्या) निर्माण झालेल्या आहेत. या सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये 30 ते 35 हजार नागरिक राहत आहेत. या सोसायट्यांमधील नागरिकांना नोकरी व व्यवसायासाठी पुणे शहर व इतर परिसरात जावे लागते. तसेच या सोसायट्यांमधील वयोवृद्ध नागरिक, महिला भगिनी तसेच शाळकरी मुलांना प्रवास करताना या भागातून बस नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची चिखली ते स्वारगेट बस सुरू करावी अशी येथील नागरिकांची आग्रही मागणी आहे.याबाबत फेडरेशनकडे देखील नागरिकांनी त्यांचे म्हणणे मांडले होते. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन तातडीने पीएमपी प्रशासनाने ही बस सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.
…असा असावा मार्ग
चिखली ते स्वारगेट बस सुरू करताना येथील लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी शिवरोड, रिव्हर रेसिडन्सी रोड, स्वराज सोसायटी रोड, वूड्सविले फेज 1,3 रोड या मार्गाने बस सुरू करावी असे निवेदनात म्हटले आहे.