Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कोरोना बाधित रुग्णांना निकृष्ट जेवण पुरविणा-या ठेकेदारांना ‘स्थायी’ सभापतीची बक्षिसी
!['Permanent' Speaker's reward for contractors providing substandard meals to corona-infected patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/100.jpg)
- स्थायी समितीची सभापतीचा निर्णय, कारवाईऐवजी दर वाढवून देण्याचा प्रताप
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिकेच्या कोरोना कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवन पुरविले जात असल्याच्या तक्रारी येत आहे. यावर कारवाई करण्याची भूमिका घेण्याऐवजी महापालिकेच्या स्थायी समितीने निकृष्ट जेवण पुरविणा-या ठेकेदारांना बक्षिसी देण्याची किमया साधली आहे. ठेकेदारांना चांगले जेवण पुरविण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर, इन्स्टि्यूशनल क्वारंनटाईन सेटंरमध्ये रुग्ण आणि कर्मचा-यांना गरजेनुसार जेवण व नाष्टा उपलब्ध करुन दिला जातो. त्यासाठी महापालिकेने ठेकेदारी पध्दतीने संस्थांची नेमणूक केलेली आहे. त्याचे निविदा व दर यापूर्वीच निश्चित झाले आहे. नव्याने निविदा न करता त्यांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, हे ठेकेदार रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाईऐवजी स्थायी समितीने त्यांना बक्षिसी देण्याची भूमिका घेतली आहे.
स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आयत्यावेळी तसा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार सध्या १८० रुपये प्रतिव्यक्ती प्रति दिन दर अदा केला जातो. मात्र, सध्या दिल्या जाणाऱ्या जेवण व नाष्टा अधिक चांगला दिला जावा. चपाती, भात, भाजी यांचे प्रमाणात वाढ करावी आणि दोन अंडी व शेंगदाणा लाडू देण्यात यावा. यासाठी दरामध्ये ५० रुपये वाढ करून १८० ऐवजी २३० रुपये असा प्रतिव्यक्ती प्रति दिन दर अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या निर्णयामुळे स्थायीच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असून रुग्णांच्य़ा नावाखाली ठेकेदारांचे भले आणि आपले आर्थिक हित साधण्याची संधी साधली जात असल्याची चर्चा होत आहे.
जेवण पुरविणा-या ठेकेदाराला अव्वाच्या सव्वा दर थेट पध्दतीने वाढवून देणे, हा प्रकार बघता पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोरोनाच्या नावाखाली लयलूट सुरू झाल्याचे दर्शविणारा आहे. मागील वर्षात कोरोना काळातील खरेदी, निविदांवरून प्रशासन अडचणीत आलेले आहे. मृतांच्या टाळुवरील लोणी खाण्याचे आरोप पालिकेवर झाले आहेत. तरी देखील या प्रकारे आर्थिक फायद्याचे धाडस केले जात आहे