PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी ज्येष्ठ पत्रकाराला प्रतिनिधीत्व मिळावे!
‘प्रेस क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड’ची भूमिका : शहराच्या विकासात प्रसारमाध्यमांचे अनन्यसाधारण योगदान!
पिंपरी-चिंचवड । पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण, निर्भीड आणि सकारात्मक योगदान देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य (नगरसेवक) म्हणून नियुक्त करण्यात यावे. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी प्रेस क्लब ऑफ पिंपरी-चिंचवडच्या वतीने करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागा इतक्या जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 37 आणि शिवसेना शिंदे गटाला 5 तर इतर 1 अशी बलाबल आहे. मिळालेल्या जागांच्या संख्येनुसार, भाजपाला 7, राष्ट्रवादीला 3 स्विकृत नगरसेवक करता येणार आहेत.
शहरातील नागरी प्रश्न, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, औद्योगिक विकास तसेच प्रशासनातील पारदर्शकता याबाबत सातत्याने लेखन करून लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. विशेषतः ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, अरुण नाना कांबळे, अविनाश चिलेकर, विवेक इनामदार, मिलिंद वैद्य, नंदकुमार सातुर्डेकर, मनोज मोरे, अनिल वडघुले, बापुसाहेब गोरे, बाळासाहेब ढसाळ आणि डॉ. विश्वास मोरे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवातून शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.
या पत्रकारांनी केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता, विकासकामांतील त्रुटी, नागरिकांचे प्रश्न, प्रशासनाच्या निर्णयांवरील सकारात्मक तसेच चिकित्सक मांडणी आणि लोकहिताच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास प्रक्रियेत माध्यमांची भूमिका मार्गदर्शक आणि समाजहिताची राहिली आहे. महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी अनुभवी आणि समाजाभिमुख पत्रकाराची नियुक्ती झाल्यास प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात अधिक परिणामकारक संवाद निर्माण होईल. यामुळे विकासकामांमध्ये पारदर्शकता वाढून लोकशाही मूल्यांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगाने प्रगती करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास प्रवासात माध्यमांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून पत्रकार प्रतिनिधीची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी अपेक्षा विविध राजकीय, सामाजिक आणि पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?
स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.




