PCMC: स्वीकृत सदस्य नियुक्तीला भाजपाचा ‘खो’; सर्वसाधारण सभेत काय होणार?
विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडून ३ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

भाजपाकडून बहुमताच्या जोरावर प्रस्ताव दप्तरी दाखलची तयारी
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १० नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला प्रशासनाकडून गती देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हा विषय अजूनही महापालिका सर्वसाधारण सभेत रखडलेलाच आहे. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सभेकडे पाठविण्यात आला असला, तरी भारतीय जनता पक्षाकडून ७ सदस्यांचे नामनिर्देशन न झाल्याने गेल्या तीन सभांमध्ये हा विषय तहकूब ठेवण्यात आला आहे.आता दि.२० एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पुन्हा हा विषय अजेंड्यावर आहे. सदरचा प्रस्ताव आता दप्तरी दाखल होवू शकतो, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी २४ फेब्रुवारी, २ मार्च आणि ४ मार्च २०२६ रोजी विविध पक्षांच्या गटनेत्यांशी बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार महापालिकेतील सध्याच्या तौलनिक संख्याबळावर आधारित सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला आहे.
महापालिकेतील एकूण १२८ सदस्यांपैकी भारतीय जनता पक्ष व अपक्ष नगरसेविका आघाडीचे ८५ सदस्य असल्याने त्यांना ७ नामनिर्देशित सदस्यांचा कोटा मिळतो, तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या ३७ सदस्यांमुळे त्यांना ३ जागा निश्चित झाल्या आहेत. शिवसेनेचे ६ सदस्य असले तरी या प्रक्रियेत त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही.
हेही वाचा – क्रीडा शिक्षकांना गैर-क्रीडा कामांमुळे खेळाडुंचे नुकसान
दरम्यान, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी ४ मार्च रोजी तीन उमेदवारांची नावे सादर केली आहेत. यामध्ये राजेंद्र जगताप, सीमा सावळे आणि फझल शेख यांची नावे ओत. या अर्जांची छाननी समितीमार्फत तपासणी करून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून ती वैध ठरली आहेत.
महासभेच्या निर्णयाकडे लक्ष…
महापालिका सभेच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या ठरावानुसार, पात्रता व अनर्हता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक हमीपत्र, घोषणापत्र व शपथपत्र सादर केल्यानंतरच अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजप आघाडीचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे एकूण १० नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र, भाजपाकडून अद्याप एकही नाव सादर न झाल्याने हा प्रस्ताव अपूर्ण राहिला आहे. यामुळेच हा विषय गेल्या तीन सर्वसाधारण सभांमध्ये तहकूब ठेवण्यात आला असून, महापालिका सभेत अंतिम मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. भाजपाकडून नामनिर्देशन केव्हा सादर केले जाते? की हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला जातो आहे? की बहुमताच्या जोरावर पुन्हा तहकूब ठेवला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





