कुदळवाडीत डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट
![Panic among citizens due to suspected patients of dengue, malaria in Kudalwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-12-at-15.50.34.jpeg)
जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती करा – दिनेश यादव…
पिंपरी । प्रतिनिधी
पावसाळ्यात डेंग्यू, कावीळ, अतिसार, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढतेय. कुदळवाडी परिसरातदेखील मलेरियासह तापाच्या पेशंटमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अनुषंगाने ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभागात घाणीचे साम्राज्य आणि पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून, तेथील स्वच्छतेसाठी पालिका स्तरावर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या संशयित पेशंटच्या संख्येत प्रभागात लक्षणीय वाढ झाली आहे.
उपचार सुरू असलेले पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी प्रभागात धुरीकरण व औषध फवारणी, जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती व तापाच्या पेशंटची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.