म्हाडाची लॉटरी लागलेल्या 935 सदनिकाधारकांना घराचा ताबा
![Ownership of 935 flat holders who won MHADA lottery](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-28T104314.383.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-वाघेरे येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनीकाधारकांना ताबा देण्यात आला. सदर प्रकल्पामध्ये 1 हजार 233 सदनीका आहेत. त्यामधील मध्यम उत्पन्न गटातील 595 सदनिका व उच्च उत्पन्न गटातील 340 सदनिका अशा एकूण 935 सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. त्या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या प्रतिनिधिक सदनिकाधारकांना चावी वितरीत करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, संदीप वाघेरे, पौर्णिमा सोनवणे तसेच बी. जी. शिर्के कंपनीचे प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने व बी. जी. शिर्के कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन कदम यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने सर्व सदनिका धारकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.
प्रातिनिधिक स्वरूपात राजेश्वर कुलकर्णी, रोहन प्रभू, शैलेंद्र धीवार, लक्ष्मी कोलते, सुधीर सावंत, रणजित कदम व इतर सदनिका धारकांना चावी देण्यात आली. आगामी काळात देखील जास्तीत जास्त लोकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे उत्तमोत्तम प्रकल्प उभारण्यासाठी आमदार म्हणून शक्य ती मदत करेल, असे आश्वासन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.