‘ना हरकत’ प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणाली यशस्वी
पिंपरी चिंचवड महापालिकेचा निवडणुकीसाठीचा पहिला प्रयोग यशस्वी

पिंपरी : .पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी प्रथमच उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली राबविण्यात आली असून, ही प्रणाली अत्यंत यशस्वी ठरल्याचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.
मागील निवडणुकांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत होते तसेच विलंब होत असल्याने उमेदवारांची अडचण होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने यावेळी pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून थकबाकी ना हरकत प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली.
या प्रणालीद्वारे महापालिकेच्या एकूण ९४ खात्यांना एकत्र जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकाच वेळी सर्व खात्यांना पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत या ऑनलाईन प्रणालीद्वारे १,१८,१७७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी खात्यांच्या शिफारशीनुसार ५०१ अर्ज बाद करण्यात आले असून, २००४ अर्जदारांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
हेही वाचा – ‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी
विशेष म्हणजे, या कक्षाद्वारे सरासरी २४ तासांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या दोन दिवसांत तर सरासरी ४ तासांच्या आत प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. या प्रणालीमुळे इच्छुक उमेदवारांची दमछाक मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, बहुतांश अर्जदारांनी या संगणक प्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.





