मार्शल ड्युटीवरील पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा; पाच जण अटकेत
![Obstructing government work by running after police on martial duty; Five arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/2Attack_20on_20police_20by_20Tadipar_20criminals-e1608085096198-1.jpeg)
पिंपरी चिंचवड | शगुन चौकात रहदारीला अडथळा येत असल्याने मार्शल ड्युटीवरील पोलिसांनी एका पथारी व्यावसायिकाला पथारी लावण्यास मनाई केली. याच कारणावरून पथारी वाल्याने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी शगुन चौक, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.राजेश मिरचूमल मायारमानी (वय 60), रेणू राजेश मायारमानी (वय 25), महंमद तबारक रैन (वय 18), मोहम्मद जुनैन शेख (वय 27, चौघे रा. पिंपरी), आस्मा हुसैन शेख (वय 24, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक हे बुधवारी सकाळी मार्शल ड्युटीवर होते. सकाळी अकराच्या सुमारास ते शगुन चौक, पिंपरी येथे आले असता आरोपींनी रहदारीस अडथळा येईल अशा पद्धतीने पथारी लावली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पथारी लावण्यास मनाई केली.
या कारणामुळे आरोपींनी पोलीस नाईक सिद्राम यांना अरेरावी करून पथारी काढण्यास नकार दिला. दरम्यान, बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळाही निर्माण केला, तसेच साथीच्या रोग नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपींना अटक केली असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.