निर्भय कन्या अभियान: चिंचवडमध्ये कराटे व महिला हक्क कार्यशाळा उत्साहात
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी संवादात्मक सत्रांचे आयोजन

पिंपरी-चिंचवड | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियान” अंतर्गत आज प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात एक दिवसीय कराटे प्रात्यक्षिक व महिला हक्क व संरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्देश महाविद्यालयातील मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास घडवणे होते. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावणे तसेच वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हाही या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा आणि सचिव डॉ. दीपक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, कराटे प्रशिक्षक सतीश राजहंस, सारिका राजहंस, शिवानी राजहंस, अँड. शुभा पिल्ले आणि विद्यार्थी विकास अधिकारी अँड. प्रा. गीता कांबळे उपस्थित होते.
हेही वाचा : महायुती जास्त काळ टिकणार नाही; सातारा घटनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल
कराटे प्रशिक्षक सतीश, सारिका आणि शिवानी राजहंस यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी महिला सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे, आत्मविश्वास वाढविण्याचे आणि परिस्थितीचे त्वरित आकलन करून योग्य निर्णय घेण्याचे तंत्र शिकवले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सराव करून स्वसंरक्षणाच्या मूलभूत हालचाली आत्मसात केल्या.
कार्यशाळा अत्यंत संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरली. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने शारीरिक तसेच मानसिक तयारीचे महत्त्व समजले. महिला हक्क व संरक्षण विषयक मार्गदर्शन अँड. डॉ. शुभा पिल्ले यांनी केले आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाची सांगता प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांनी सत्कार करून केली, तर प्रस्तावना व आभार मानले विद्यार्थी विकास अधिकारी अँड. प्रा. गीता कांबळे यांनी.
आजच्या युवा पिढीसाठी स्वसंरक्षण फक्त कौशल्य नाही, तर आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढविण्याचे माध्यम आहे. मुलींना सुरक्षिततेसाठी सज्ज करणे हीच खरी शिक्षणाची जबाबदारी आहे.
– डॉ. दीपक शाह, सचिव.





