breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

कर संकलन विभागाचे नीलेश देशमुख ‘‘रॉक्स’’। अक्षरश: टी-20-20 स्टाईल ‘बॅटिंग’; 60 दिवसांत 300 कोटी वसूल!

पावणेतीन लाख मालमत्ता धारकांनी भरला कर : सवलतींचा लाभ घेण्यासाठी तत्काळ कर भरणा करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाची ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्टाईल ‘बॅटिंग’ सुरू असून अवघ्या 60 दिवसांत तब्बल 308 कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेत 2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी आपला कर भरणा केला आहे. तसेच 30 जूनपर्यंत असलेल्या कर सवलतींचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

शहरात 6 लाख 30 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गतवर्षी विभागातर्फे राबविलेले विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीसा, नळ कनेक्‍शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह सलग दुसऱ्यावर्षी महिलांच्या सिध्दी प्रकल्पा अंतर्गत बिलांचे घरपोच आणि वेळेत वाटप करण्यात आले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणून मालमत्ता धारक कर संकलन कार्यालयासमोर अक्षरशः रांगा लावून कराचा उत्स्फूर्तपणे कर भरत असल्याचे चित्र प्रथमच दिसून येत आहे. यावरून शहरवासीयांनी शहर विकासात हातभार लावण्याची एक प्रकारे जबाबदारी स्वीकारली आहे.

6 लाख 30 हजार मालमत्तांपैकी 2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी 308 कोटी 42 लाख 31 हजार रुपयांचा कर जमा केल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी

2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 2 लाख 39 हजार 40 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 20 हजार 799 बिगर निवासी, 6 हजार 88 मिश्र,1 हजार 972 औद्योगिक तर 1661 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी तत्काळ कर भरावा

गतवर्षी सिध्दी प्रकल्पा अंतर्गत महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप करण्यात आले होते. करदात्यांनी कर भरण्यास मोठी गर्दी केली होती. त्यामुळे जूनमध्ये अनेक नागरिकांना कर भरता आला नाही. यंदा जूनच्या शेवटी गर्दी टाळण्यासाठी ज्यांना ज्यांना बिले मिळत गेली अशा नागरिकांना 31 मे पूर्वी कर भरण्याचे एसएमएसव्दारे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे काही नागरिकांचा सवलत योजनांबाबत गैरसमज झाला. मात्र, नागरिकांची एकाचवेळी गर्दी होऊ नये म्हणून बिले मिळताच कर भरावा, असे सांगण्यात आले होते. तसेच कर सवलत योजना बिलामध्ये नमुद केल्याप्रमाणे 30 जूनपर्यंत लागू असून नागरिकांनी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट न बघता, रांगेत जास्त वेळ उभा राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी योजनांचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा.

ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती

कर संकलन विभागाने सर्व सेवा सुविधा ऑनलाइनच्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा मालमत्ता धारकांना प्रचंड मोठा फायदा होत असून करदाते दिवसेंदिवस ‘हायटेक’ होत आहेत. तसेच ऑनलाइन कर भरणाऱ्यांना नागरिकांना 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे 2024-25 च्या आर्थिक वर्षांतील दोन महिन्यात 1 लाख 99 हजार 807 नागरिकांनी 218 कोटी 29 लाख 29 हजार रूपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.

तीन महिन्यांत पाचशे कोटींचे उद्दिष्ट

गतवर्षी पहिल्या तिमाहीत साडेचारशे कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला होता. यामध्ये 35 कोटी उपयोग कर्ता शुल्काचे होते. तर 2024-25 या आर्थिक वर्षातील दोन महिन्यात 308 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. असे असले तरी कर संकलन विभागाने पहिल्या तिमाहीत पाचशे कोटींचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

…असा आला रुपया

ऑनलाइन-218 कोटी 29 लाख

विविध ऍप- 8 कोटी 48 लाख
रोख-19 कोटी 32 लाख
धनादेशाद्वारे-12 कोटी 81लाख
एनइफटी -9 कोटी 21 लाख
इडीसी- 1 कोटी 71 लाख आरटीजीएस-1 कोटी 72 लाख डीडी-70 लाख 85 हजार.

वाकड झोनमध्ये सर्वाधिक भरणा

कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 759, सांगवीमध्ये 29 हजार 382, चिंचवडमध्ये 24 हजार 124, थेरगावमध्ये 24 हजार 727, पिंपरी वाघेरेमध्ये 18 हजार 529 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी पिंपरी नगर झोनमध्ये फक्त 3 हजार 19 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button