वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागात स्पेशालिटी क्लिनिक नव्याने सुरू
किडनीचे आजार, मधुमेह, पक्षाघात व मज्जातंतूच्या आजारांची १० रुपयात तपासणी होणार
पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेडिसीन विभागात स्पेशालिटी क्लिनिक नव्याने सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रवीण सोनी, सहयोगी प्राध्यापक डॉ. निरंजन पाठक, डॉ. नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेडिसीन विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये किडनीचे आजार, मधुमेह, पक्षाघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांवर अत्यंत माफक दरात तपासणी होणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागात सुरू झालेल्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये किडनीचे आजार, मधुमेह, पक्षाघात व मज्जातंतू संदर्भातील रुग्णांची संबंधित आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या १० रुपये या अत्यंत माफक दरात तपासणी होणार आहे. गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात या सेवेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.