राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अर्शान शेख यांची निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी युवकांवर विश्वास टाकत पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अर्शान शकीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र युवक शहराध्यक्ष श्री. शेखर चंद्रकांत काटे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहराध्यक्ष श्री. योगेश मंगळसिंह बहल यांच्या मार्गदर्शनाखाली अर्शान शेख यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, युवकांना संघटित करणे आणि संघटन विस्तारासाठी सक्रिय योगदान देणे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘भाजपाच्या ध्येयधोरणांची माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून काम करण्याचा मानस’; निशा यादव
अर्शान शेख हे सामाजिक कार्यात सक्रिय असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच विविध समाजउपयोगी उपक्रम ते राबवत असतात, त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला नवे बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. पक्षाचे ध्येय-धोरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल अर्शान शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.




