पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शक्तीप्रदर्शन; उद्या जाहीर सभा
नवीन कार्यालयाचे लोकार्पण: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
![Nationalist Sharad Pawar group's show of strength in Pimpri-Chinchwad; Public meeting tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sharad-Pawar-780x470.jpg)
पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने पक्षाचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण उद्या शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली.
राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शनिवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा डालको ग्राउंड, एच. ए. कंपनीच्या बाजूला असणाऱ्या मैदानात होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश म्हस्के, प्रशांत जगताप, जावेद हबीब,मेहबूब शेख यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सनशाईन मार्क्स इमारतीमध्ये दोन हजार चौरस फुटाचे विविध कक्ष असलेले भव्य कार्यालय तयार केले आहे. यामध्ये स्वतंत्र महिला कक्ष, मध्यवर्ता वाचनालय, आधार कार्ड सुविधा कक्ष,आभा कार्ड सुविधा कक्ष,मतदान कार्ड सुविधा कक्ष, विविध शासकीय योजना (महापालिका ते केंद्र सरकार) कक्ष, सभा कक्ष, सोशल मीडिया रुम इत्यादीचा समावेश आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. विशेष बाब म्हणजे कुटुंबात आरोग्य विषयी गंभीर परिस्थिति निर्माण झाल्यास कुटुंबाला योग्य वैद्यकीय सल्ला व कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी ‘शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र’ ची सुविधा या कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. याचा फायदा शहर व जिल्ह्यातील गरजू लोकांना होणार आहे, अशी महिती माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी दिली.