भांडण सोडविल्याच्या कारणावरून ओटास्कीम येथे एकाचा खून; चारजण पोलिसांच्या ताब्यात
![Murder of one at Otaskim for resolving a dispute; Four people are in police custody](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/murder-1.jpg)
पिंपरी चिंचवड | ओटास्कीम निगडी येथे एकाचा खून झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री घडली. भांडण सोडविल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यात संपत यांनी भांडण सोडविण्याची भूमिका घेतली. या कारणावरून आरोपींनी संपत यांना शस्त्राने मारून त्यांचा खून केला.
खुनाची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपी देखील अण्णाभाऊ साठे नगर येथील असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.