दुकानातील चार्जर देण्यावरून वाद घालत अल्पवयीन मुलाचा गोळ्या झाडून खून
![Murder of a minor boy by arguing over giving a charger in the shop](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/murder-1-1.jpg)
पिंपरी चिंचवड | मोबाईल शॉपी मधील साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या दुकानदाराने त्याच्या 16 वर्षीय भाच्याला दुकानात बसवले. त्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या एका इसमाने मोबाईल दुकानदाराच्या भाच्यासोबत बाचाबाची करून त्याच्यावर गोळी झाडून त्याचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री शिवराजनगर येथे घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.ओवेज इनामदार (वय 16, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराजनगर, वाकड येथे मयत ओवेज याच्या मामाचे एक्सपर्ट मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक स्वतः डिलिव्हरी देण्याचे देखील काम करतात. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दुकानदार हिंजवडी येथे मोबाईल साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानदार मामाने ओवेज याला दुकानात थांबवले होते.त्यावेळी आरोपी मोबाईल चार्जर मागण्यासाठी दुकानात आला. आरोपी वारंवार दुकानात येऊन चार्जर मागत असे. त्यानंतर चार्जर घेऊन जात व त्याचे पैसे देत नसे. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने दुकानदार देखील त्याला जास्त विरोध करत नव्हते. रविवारी रात्री तो पुन्हा दुकानात आला. त्याने चार्जर मागत ओवेज याच्यासोबत बाचाबाची केली. त्यावेळी ओवेजने दुकानदार मामाला फोन करून याबाबत सांगितले.
त्यावेळी दुकानदाराने आरोपीला पटकन चार्जर देण्याबाबत सांगितले. दरम्यान आरोपीने ओवेज सोबत वाद घातला. तसेच त्याच्या कमरेचे एक गावठी पिस्तूल काढून त्यातून गोळी झाडत ओवेजचा खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.