चाकण बाजारपेठे येथे खुनी हल्ल्याची घटना : तिघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/murder1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
चाकण बाजारपेठ येथे बुधवारी (दि. 23) रात्री सव्वादहा वाजता तिघांनी मिळून एका व्यक्तीवर कोयता आणि लाकडी दांडक्याने खुनी हल्ला केला. यात हल्ला झालेला व्यक्ती गंभीर जखमी झाला.
प्रीतम शंकर सिंग परदेशी, विनोद शंकर सिंग परदेशी, रोहित चंद्रसिंग परदेशी (सर्व रा. चाकण, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय विजय परदेशी (वय 42, रा. चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी उदय परदेशी हे त्यांच्या मित्रासोबत शतपावली करत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना रस्त्यात गाठले. ‘तुला कसली मोजणी करून पाहिजे. तुला जिवंत ठेवत नाही. तुला खल्लासच करतो’ असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी आरोपींच्या तावडीतून सुटून घरी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांना गाठून पुन्हा मारहाण करून गंभीर जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.