शहरातील कोरोनाबाधीत नागरिकांना महापालिकेने मोफत उपचार द्यावेत – जितेंद्र ननावरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/jitendra-nanaware-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेचे वाय.सी.एम.रुग्णालय कोरोनावर उपचार करण्यासाठी समर्पित केले आहे. इतर रुग्ण डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जातात, तेव्हा त्या ठिकाणी सर्वच रुग्णांना पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरा तरच ॲडमिट करू, असे सांगितले जाते. या ठिकाणी पैसे भरल्याशिवाय उपचार होत नाहीत. आपत्कालीन कायद्याअंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गोरगरीब नागरिकांना एक वेळ जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच आजारी पडल्यावर उपचारासाठी एवढे पैसे आणयचे कोठुन असा प्रश्न सर्वसामान्य गोरगरीबांना पडत आहे. वायसीएम येथील डॉक्टरांशी संपर्क केल्यावर रुग्णांना ससून हॉस्पिटल अथवा औंध हॉस्पिटल येथे घेऊन जा असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन व्यवस्था लोकांना उपलब्ध नाही. रुग्णवाहिका व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण आहे. त्यामुळे कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांचे हाल होत आहेत. मोफत उपचार मिळत नसल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. त्यामुळे पत्कालीन कायद्याअंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरिबांना मोफत उपचार द्यावेत, असे या निवेदनात ननावरे यांनी म्हटले आहे.