जागतिक दर्जाच्या ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी साठी महापालिका आयुक्त सहअध्यक्ष
पिंपरी – राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी साठी (सायन्स सिटी) राज्य सरकारने कार्यकारी समिती आणि कार्यबल गट उभारला आहे. पुढील पाच वर्षांत ‘सायन्स सिटी’ उभारण्यासाठी सर्व प्रकारचे आवश्यक ते धोरणात्मक निर्णय आणि निधी वितरण करण्यासारखे निर्णय कार्यकारी समितीमार्फत घेण्यात येतील. तर, सायन्स सिटी उभारण्यासाठी आणि राज्य सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यबल गटाची असणार आहे. कार्यबल गटाचे सहअध्यक्ष महापालिका आयुक्त असणार आहेत.
राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2025 पर्यंत व्यापक धोरण आणि व्हिजन डॉक्युमेंट विकसित केले आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ‘सायन्स सिटी हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड येथे उभारण्यास मंत्रिमंडळाच्या 1 सप्टेंबर 21 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 7.5 एकर जागा विज्ञान केंद्र उभारण्यासाठी दिली आहे. त्यापैकी 1.75 एकर जागेवर महापालिकेने यापूर्वीच एक विज्ञान केंद्र उभारले आहे. उर्वरित 5.75 एकर जागा सायन्स सिटी उभारण्यासाठी उपलब्ध आहे. या जागेवर पुढील पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संमतीने सायन्स सिटी उभारण्यात येत आहे.
सायन्स सिटी उभारण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त हे सदस्य असणार आहेत. तर, राज्याचे शिक्षण आयुक्त हे कार्यकारी समितीत सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त हे सहअध्यक्ष आहेत. तर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, नेहरू विज्ञान केंद्राचे (मुंबई) संचालक, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विज्ञान केंद्राचे संचालक,शिक्षण आयुक्त कार्यालय पीडब्लूसी सल्लागार आणि उपसंचालक (अंदाजपत्रक व नियोजन) हे सदस्य असणार आहेत.
सायन्स सिटी उभारण्यासाठी आवश्यक ती अंमलबजावणी करणे. जागतिक दर्जाची सायन्स सिटी उभारण्यासाठी राज्य सरकारच्या मंजूर निधीशिवाय स्थानिक पातळीवरून निधी उपलब्ध करणे. औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी अशा स्रोतांद्वारे निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही करणे ही कामे कार्यबल गटाची आहेत.
सायन्स सिटीची वैशिष्ट्य!
जागतिक दर्जाची ‘सायन्स सिटी असेल. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि ती जोपासणे,
पिंपरी-चिंचवडमधील 5.75 एकर जागेत साकारणार. पुढील पाच वर्षात उभारणी शक्य. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत 191 कोटी रुपयांचा निधी मंजूर.