Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत प्रवेशासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर

बचाव मोहिमेला गती : एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य वेगात

पिंपरी-चिंचवड | मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवती साचलेला मोठ्या प्रमाणातील मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अतिरिक्त यंत्रसामग्रीच्या मदतीने बचाव मोहिमेला गती देण्यात आली आहे. इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि महापालिका प्रशासनाकडून समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत.

दुर्घटनास्थळी सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याबरोबरच बाजूचा मलबा हटविण्याचे काम जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने सुरू आहे. बचाव पथके अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अत्यंत काळजीपूर्वक कारवाई करत आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी घटनास्थळी पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला. प्रत्यक्ष परिस्थिती, इमारतीची सद्यस्थिती आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन पुढील बचाव मोहिमेची रणनीती निश्चित करण्यात आली.

दुर्घटनेला ४५ तासांहून अधिक कालावधी उलटला असून, अडकलेल्या नागरिकांपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यरत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. सर्व संबंधित यंत्रणांना बचावकार्य अधिक वेगाने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं..

इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने मागील बाजूने सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आत अडकलेल्या व्यक्तींचे संभाव्य स्थान निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांची घटनास्थळी भेट

दरम्यान, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटनेची आणि बचाव मोहिमेची सविस्तर माहिती घेतली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी नातेवाईकांना दिला धीर

महापौर रवि लांडगे यांनीही घटनास्थळी पाहणी करून दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. बचावकार्य समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने सुरू असून प्रत्येक अडकलेल्या व्यक्तीपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी नातेवाईकांना दिली. तसेच प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button