पिंपरी-चिंचवडमधील युवा पत्रकार मिलिंद कांबळे यांना ‘‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’’
- महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याहस्ते यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’’ युवा पत्रकार मिलिंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त महापालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आयुक्त राजेश पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, संघाचे बापू गोरे, अनिल वडघुले आदी उपस्थित होते.
यावेळी महापौरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना काळात पत्रकारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन वार्तांकन केले. अवघे जग लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले असताना सर्व देशबांधवांना घरी बसून बातम्या वाचता व पाहता येत होत्या. पत्रकारांनी कर्तव्य तत्परपणा व जबाबदारीचे भान त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.
महापौर ढोरे म्हणाल्या की, नागरिकांना मार्गदर्शन करणारे, त्यांना जागृत करणारे पत्रकारिता हवी. त्यातून समाजाचे हित साधले गेले पाहिजे. पत्रकारांना महापालिका रूग्णालयात धन्वंतरी आरोग्य योजना लागू करण्याची मागणी रास्त आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पंतप्रधान आवास योजनेचा त्यांना लाभ मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पत्रकारांनी या स्पर्धेच्या व महागाईच्या युगात एकच व्यवसाय किंवा नोकरीवर विसंबून न राहता नियमित उत्पन्न मिळेल असा दुसरा समांतर उद्योग करावा. पत्रकारांची लेखणी बंदुकीच्या गोळीप्रमाणे असते, तिचा संयमानेच वापर करावा. एक सच्चा पत्रकार उत्कृष्ट समाजसेवक होऊ शकतो. अनिल वडघुले यांनी स्वागत केले. दादा आढाव यांनी सुत्रसंचालन केले. सुरज साळवी यांनी आभार मानले.