प्रभाग १६ मध्ये महायुतीत जागावाटपाचा पेच
रिपाइं उमेदवारांची पर्यायी रणनीती

पिंपरी चिंचवड: पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये महायुतीतील जागावाटपावरून वाद तीव्र होत चालला आहे. महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांना जागा दिल्यास भाजपची एक जागा कमी होणार असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भाजपकडे इच्छुक आणि तयारीत असलेले उमेदवार असताना रिपाइंला जागा का द्यावी, असा थेट सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रभागातील निवडणूक आधीच अत्यंत चुरशीची मानली जात आहे. अजित पवार गटाकडून माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे प्रभावी उमेदवार मानले जात असून, त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करणे महायुतीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. महिला जागेबाबतही संभ्रम कायम आहे. संगीता भोंडवे यांच्या उमेदवारीवर पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा असून, ओबीसी महिला उमेदवाराच्या शोधासाठीही हालचाली सुरू आहेत. त्यातच या प्रभागातील एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सर्वच पक्षांची राजकीय गणिते बदलली आहेत.
हेही वाचा – सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांचा नागरिकांशी थेट संवाद
मागील निवडणुकीत बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र सध्या ते शिंदे गटासोबत असल्याने या प्रभागातील भाजपची ताकद काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे उमेदवार उपलब्ध असतानाही रिपाइंला जागा देण्याची चर्चा सुरू असल्याने असंतोष अधिकच वाढला आहे.
दरम्यान, रिपाइंचे संभाव्य उमेदवार धर्मपाल तंतरपाळे यांनी काही दिवसांपूर्वीच रिपाइंमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास मनसे किंवा शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी ठेवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असून, महायुतीकडून अंतिम निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




