breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत टपऱ्या, पत्राशेडवरील कारवाई थांबवण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
शिवसेना नेते धनंजय आल्हाट यांची मागणी

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड अनधिकृत टपऱ्या, व पत्राशेडमुक्त शहर घडवण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, मोशीतील अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेडच्या बांधकामांवर कारवाई करु नये, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना नेते धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्त्वाखाली हा मुद्दा उपस्थित करीत आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वांत स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी रस्ते, फुटपाथवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी धडक कारवाई पथकाला सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय अथवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता कर्तव्य बजावण्याचे आदेशही दिले आहेत.
शहरातील नागरिकांची जगण्याची गुणवत्ता विकासकामांच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली नैतिक जबाबदारी व भान ठेवून काम करावे. एकसंघपणे सर्वांनी काम करुन येत्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहर देशातील सर्वांत सुंदर आणि स्वच्छ वपत्राशेड, अतिक्रमणमुक्त शहर बनवण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा, अशी ताकीदही आयुक्तांनी दिली आहे.
दरम्यान, मोशी आणि चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकलप उभारण्यात आले आहेत. वाढती लोकवस्ती लक्षात घेत रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेड उभारण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अशा बेकायदा टपऱ्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या धडक कारवाईला विरोध केला आहे.
शिवसेना नेते धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये मोशीतील टपऱ्या आणि पत्राशेडवरील कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक राज आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे शहरातील सर्वाधिकार आहेत. आता अतिक्रमण आणि प्रत्रशेड हटवण्यावरुन महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते आणि आयुक्त असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात मोशीतून झाली आहे. कारण, ‘‘कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमण कारवाई करा’’ अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुसरीकडे, ‘‘दोन दिवसांत निर्णय घेवू’’असे आश्वासनही शिवसेना नेते धनंजय आल्हाट यांना आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका आयुक्त विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, अतिक्रमण आणि पत्राशेडवरील कारवाई आयुक्त थांबवणार का? हे याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button