आशियाई डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिलेदारांची चमक!
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते प्रशिक्षक डॉ. हनुमंत लुंगे यांचा गौरव

पिंपरी-चिंचवड : जपानमधील चिबा येथे पार पडलेल्या आशियाई डॉजबॉल स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. या राष्ट्रीय संघात महाराष्ट्राच्या पाच दिग्गज खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करत राज्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे. या यशाचे शिल्पकार आणि महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांचा जळगाव येथे केंद्रीय क्रीडा मंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या ‘या’ पाच खेळाडूंनी गाजवले मैदान : भारतीय संघात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये: आशिष जगताप (बीड): यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत संघाचे यशस्वी नेतृत्व केले. प्रतीक अलिबागकर व प्रथमेश गायकवाड (पुणे): यांनी आपल्या चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना चकीत केले. शरद बडे (धाराशिव): आणि विनायक सपकाळ (जळगाव): यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
हेही वाचा – ‘विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

जळगाव येथे दिमाखदार सत्कार सोहळा
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांनी डॉ. हनुमंत लुंगे यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. लुंगे यांच्यासोबतच डॉजबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजेश जाधव आणि उपाध्यक्ष श्री. कैलास करवंदे यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा सचिव श्री. योगेश सोनवणे, श्री. गिरीश पाटील, श्री. सचिन महाजन, श्री. अनिल चव्व्हाण, श्री. संकेत साळुंखे, श्री. अतुल पडोळे, डॉ. हरीष काळे, डॉ. सुगंध बंड, श्री. अशोक खंडारे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. डॉ. लुंगे यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांमुळेच ग्रामीण भागातील खेळाडू आज जागतिक नकाशावर चमकत आहेत.”
— ना. रक्षाताई खडसे, केंद्रीय क्रीडा मंत्री




