न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
शिक्षण विश्व : ‘युवा दिन’ सोबत ‘महिला शक्ती’चा जागर !

पिंपरी-चिंचवड | येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊसाहेब आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात ‘युवा दिन’ आणि ‘महिला शक्ती’ यांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या नाईक होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अग्निस मॅडम, विजयकुमार माने , जयेश सर आणि वैभव हडप उपस्थित होते.

हेही वाचा : सरकारने ‘वाघ’ कधीच मारून टाकला; राज ठाकरेंची निवडणूक आयुक्तांवर टीका
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षीय भाषणात विद्या नाईक यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी किती प्रेरणादायी आहेत, यावर प्रकाश टाकला. “आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा संयम आणि जिजाऊसाहेबांचे शौर्य अंगीकारणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी विजयकुमार माने सर आणि जयेश सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राजमाता जिजाऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, त्यांची दूरदृष्टी व राष्ट्रनिर्मितीतील योगदान याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय सुयोग्य पद्धतीने केले होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




