Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत दोन हजार कोटींची गुंतवणूक; व्यावसायिक भूखंड होणार विकसित

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुढाकाराने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार केंद्र येथे ९६ हेक्टर भूखंडावर सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

त्यामध्ये व्यापार केंद्र (कन्व्हेन्शन हॉल), पंचतारांकीत हॉटेल, आर्थिकदृष्ट्या परवडणारी हॉटेल्स, परिषद सभागृह (कॉन्फरन्स हॉल) यासह व्यावसायिक भूखंड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे जवळपास एक लाख तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या विकास प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या वैभव आणि नावलौकीकात भर पडणार आहे.

मोशी येथील पीएमआरडीएच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात येत आहे. याठिकाणी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, लष्कराचे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचबरोबर पीएमआरडीए स्वतः बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांसाठी येथे दर्जेदार बांधकामांशी संबंधित प्रदर्शन भरवित असते. येथे विविध क्षेत्रांतील अन्य प्रदर्शने देखील भरविण्यात आली आहेत.

हेही वाचा     –        राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले.. 

प्रदर्शन केंद्रातील केवळ दहा टक्के विकास प्रकल्प आजपर्यंत विकसित केले आहेत. आता उर्वरित विकास प्रकल्प देखील विकसित करण्यात येणार आहेत. पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन केंद्रातील ९६ हेक्टर जागेवर दोन हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील विविध विकास कामांसाठी पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात केवळ पाच कोटींची तरतूद आहे. हे प्रकल्प विकसित करण्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्वउत्पन्नावर हे शक्य नसल्यामुळे पीएमआरडीएने ३१ जानेवारी २०२४ रोजी दोन हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवला होता.

परंतु त्‍यावर सकारात्‍मक तोडगा न निघाल्‍याने या प्रकल्पातील सर्व गुंतवणूक पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. अशा प्रकारचे प्रकल्प विकसित करण्याची क्षमता असणाऱ्या संस्थांना पीएमआरडीएकडून निमंत्रित करण्यात येत आहे.

असे राहणार स्वरूप…

-पाच हजार प्रेक्षकांची आसनक्षमता असणारा कन्व्हेन्शन हॉल

-३५ हजार स्क्वेअर मीटरची तीन सभागृहे तयार करण्यात येणार

-एक पंचतारांकित, तर सर्वसामान्यांसाठी तीन हॉटेल बांधणार

-उर्वरित मोकळ्या भूखंडावर वाणिज्य वापरासाठी प्लॉटिंग

-उद्योजकांनाही सहभाग घेता येणार

मोशी येथील अद्ययावत प्रदर्शन व कन्‍वेंशन केंद्राच्या जागेवर वाहनतळ, हॉटेल्‍स व व्‍यावसायिक गाळ्यांची देखील निर्मिती केली जाणार आहे. उद्योजकांसाठी त्‍याचा वापर करता येईल, असा पीएमआरडीएचा मानस आहे. त्‍यांच्‍याकडून येणाऱ्या निधीतून या प्रकल्‍पाच्‍या खर्चाची व्‍यवस्‍था करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.

विकास कामाचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. हा संपूर्ण प्रकल्प विकसित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडसह लगतच्या भागातील तरुणांसाठी किमान एक लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पातील सर्व विकासकामे पीपीपी तत्वावर करण्यात येणार आहे.

मोशीतील अद्ययावत प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या प्रकल्पाबद्दल वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे.

– डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button