प्रेरणादायी: महिलादिनी भैरवगडाची ५०० फुटाची कातळ भिंत केली सर!
![Inspirational: On Women's Day, Bhairavgad's 500 feet thick wall was built, sir!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Bhairavgad-pcmc.jpeg)
महाराष्ट्राच्या लेकींची यशस्वी कामगिरी
पिंपरी | प्रतिनिधी
शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेने महाराष्ट्रातील निवडक 12 मुलींसाठी गिर्यारोहणाच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. याच मुलींच्या प्रशिक्षण शिबिराला बसाल्ट क्वीन असे नामकरण केले होते. शिवदुर्ग च्या प्रशिक्षकांनी जे प्रशिक्षण दिले होते त्या सर्व प्रशिक्षकांना महिला दिनी मुलींच्याकडून गुरु दक्षिणेची भेट देण्यासाठीच भैरवगड कातळ भिंती वरील चढाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
‘मोरोशी’ भैरवगड या किल्ल्याची उंची ४००० फुट असून किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग आहे ,माळशेज डोंगररागेतील हा किल्ला ठाणे जिल्हयात असून अत्यंत कठीण श्रेणीत गणला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे भैरवगडाचा बालेकिल्ला. तो अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ५०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे.
महिलादिनानिमित्त गिरिजा धनाजी लांडगे १२ वर्षे (भोसरी), खुशी विनोद कांबोज – २१ वर्षे (कोल्हापूर ) अरमान मुजावर – २२ वर्षे ( तासगाव सांगली ) या तिघींनी मिळून ही मोहीम यशस्वी केली
महिलादिनाचे औचित्य साधून सकाळी ११ वाजता सह्याद्रीतील भैरवगडाचे पूजन करुन गिर्यारोहणास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मुली या तिसऱ्या स्टेशन पर्यंत पोहोचल्या .विशेष म्हणजे पहिल्या व दुसऱ्या स्टेशन पर्यंत शिडीचा वापर न करता प्रस्तरारोहण केले.आणि तिसऱ्या स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये असणारा ओव्हरहॅंग खूपच कसोटी बघत दमछाक करणारा आहे , पण हळुहळु मुव्ह करत संध्याकाळी ५ वाजेदरम्यान तिघीही तिसर्या स्टेशन पर्यंत पोहोचल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी ११ च्या दरम्यान तिसऱ्या स्टेशन पासून पुढील चढाईला सुरुवात झाली. तिसऱ्या स्टेशन पासून ट्रॅव्हर्स मारत ओपन बुक सेल्फ आणि त्यानंतरची क्रॅक पार करत मुली अंतिम धेय्याकडं पोहोचत होत्या , भिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कोणताही बोल्ट नसून ७० अंश कोनात १००-१२५ फुट स्क्री (मातीची निसरडी घसरण ) अशी चढाई आहे. ती चढून या तिघी भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचत ४.१५ वाजता मोहीमेत यशस्वी झाल्या.
ही मोहीम गणेश गीध यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.तसेच अनुभवी गिर्यारोहक राज बाकरे,राहुल देशमुख,आकाश आंबुर,अभिषेक वैद्य,ऋग्वेद ललित,कोमल विचारे आणि रामदास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच अजय राऊत आणि विनायक शिर्के ,समिट ॲडव्हेंचर्स, कोल्हापूर जिल्हा माउंटेनरिंग ॲण्ड अलाईड स्पोर्ट्स असोसिएशन आणि डेला ॲडव्हेंचर पार्क लोणावळा यांच्या सहकार्यांने हि मोहिम यशस्वी झाली.