मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य ” योजनेतील लाभाची रक्कम वाढवावी
जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा सीमा सावळे यांचे महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी-चिंचवडः
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय युवक/युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी रक्कम रुपये १ लाख ५० हजारचा लाभ दिला जातो. मनपाच्या या अत्यंत चांगल्या योजनेमुळे मागासवर्गीय समाजातील अनेक युवक व युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. सदर योजनेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आले आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय युवक/युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य ” योजनेतील लाभाची रक्कम वाढवावी जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा, सीमा सावळे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
सावळे यांनी सदर निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांमध्ये परदेशातील शैक्षणिक संस्थांची “फी” आणि इतर खर्च वाढले आहेत. कोविड कालानंतर विमानाच्या तिकिटांचे दरदेखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. तसेच डॉलर/युरो/पाउंड सारख्या इतर अनेक परकीय चलनाचा दर देखील २५ ते ३० % ने वाढले आहेत. अशा स्थितीत मागासवर्गीय समाजातील अनेक युवक व युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. तरी या बाबींचा विचार करून उपरोक्त योजनेंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम वाढवून ४ ते ५ लाखांपर्यंत करण्यात यावी. परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याने सदर निर्णय आपण प्राधान्याने घ्यावा. अशीही मागणी सीमा सावळे यांनी केली आहे.