जोखिम पत्करुन काम करणाऱ्या पत्रकारांचा महापालिका “धन्वंतरी”योजनेत समावेश करा: ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे
![Include risky journalists in Municipal Corporation "Dhanvantari" scheme: Senior journalist Bapu Saheb Gore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/90191fe1-b5f1-47a8-858b-941a977f8629.jpg)
- दर्पणकार दिनानिमित्त कार्यक्रमात केली मागणी
- महापालिका प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनासारख्या भयावह काळात पत्रकार जोखीम पत्करून पत्रकारिता करतात त्यांना कसलीही सुरक्षा नाही तरी पिंपरी महापालिकेने महापालिकेत बातमी देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा “धन्वंतरी आरोग्य” योजनेत समावेश करावा अशी मागणी पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पिंपरी महापालिकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघातर्फे दर्पणकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पिंपरी महापालिका कै मधुकर पवळे सभागृहात केले होते.यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे,आयुक्त राजेश पाटील,उपमहापौर नानी घुले,सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके,स्थायी समिती सभापती अँड नितीन लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोशल मीडिया परिषदेचे राज्य प्रमुख बापूसाहेब गोरे म्हणाले की “पत्रकार नेहमी जोखीम पत्करून पत्रकारिता करतात,मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात राज्यात 169 पत्रकार मृत्युमुखी पडले असून पाच हजारापेक्षा जास्त पत्रकार कोरोना बाधित झाले असताना राज्य सरकारकडून कसलीही मदत मिळाली नाही.पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनीही कोरोनाच्या काळात स्वतःची व परिवाराच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी बातम्या प्रसारित केल्या आहेत.जोखीम पत्करून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचारी व पदाधिकारी सुरू असलेल्या “धन्वंतरी ” योजनेत समावेश करावा अशी मागणी आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत केली असून महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे सांगितले.
मोठ्या उत्साहात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यास विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले तर सूत्रसंचालन दादाराव आढाव यांनी व पुरस्कारार्थी माहिती वाचन माधुरी कोराड यांनी केले, आभार सोशल मीडिया परिषद अध्यक्ष सूरज साळवे यांनी मानले.