मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘कोर्टात’ खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड, अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे!
![Good News for Pimpri-Chinchwadkars: Link your mobile number to income and get 3 percent discount on general tax!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/pimpri-chinchwad-PCMC-1-780x470.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर महापालिका प्रशासनातील बदल्यांचा धडाका सुरू आहे. महापलिका अतिरिक्त आयुक्त- ३ पदावर सुनिल थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमध्ये शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांची शिफारस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांवर पदोन्नतीमध्ये अन्याय होतो आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
दरम्यान, महापालिका आस्थापनेवरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे अतिरिक्त आयुक्त-३ या पदावर संधी द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यासाठी नगर सचिव विभागाचे सहआयुक्त उल्हास जगताप यांच्या नावाची शिफारस लांडगे यांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड ठरले. त्याद्वारे सुनिल थोरवे यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त- ३ या पदाचे कामकाज नगरविकास विभागाचे सहआयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे अनेक दिवसांपासून सोपवले होते. या पदासाठी अपेक्षीत अनुभव आणि शैक्षणिक आर्हता असतानाही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या पदावर सुनिल थोरवे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काढले. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बारणे- लांडगे यांच्यात समन्वयाचा अभाव?
वास्तविक, या पदावर महापालिका अस्थापनेवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. तसेच, उल्हास जगताप यांची आर्हता असून, त्यांना नियुक्ती मिळावी. यासाठी मागणी केल्याचेही महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांच्या मदतीने सुनिल थोरवे यांनी ‘सातारा कनेक्शन’ चा वापर करीत अतिरिक्त आयुक्त- ३ पदावर संधी मिळवली. महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह आणि आता अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे यांच्या नियुक्तीमध्ये खासदार बारणे यांचा ‘रोल’ निर्णायक असल्याने महापालिका प्रशासकीय यंत्रणेवर बारणेंचा वचक वाढल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, बदली आणि नियुक्तींमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे बारणे आणि लांडगे यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.