राजगुरूनगर बँकेत सत्ताधारी पॅनेलचाच वर्चस्व, भीमाशंकर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीने गुलाल उधळला
![In Rajgurunagar Bank, the ruling panel dominates, Bhimashankar panel's workers lashed out at JCB.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Rajgurunagar-Bank-is-dominated-by-the-ruling-panel.jpeg)
पिंपरी: राजगुरूनगर सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनेलला १६ पैकी १२ जागांवर घवघवीत बहुमत मिळाले. विरोधातील राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलने ४ जागांवर बाजी मारली. अनुसूचित जाती-जमाती गटातून विजय डोळस हे बिनविरोध निवडून आले आहेत.
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतदान मोजणी सोमवारी (दि. ७) येथील चंद्रमा कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी निबंधक हर्षित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शांततेत पार पडली. रविवारी (दि. ६) माजी अध्यक्ष व संचालक किरण आहेर, किरण मांजरे यांच्या नेतृत्वाखालील भीमाशंकर तसेच गणेश थिगळे यांच्या सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही पॅनेलमध्ये प्रचारात जोरदार चुरस व आरोप-प्रत्यारोप झाले. अटीतटीने झालेल्या मतदानाचा निकाल जाणून घेण्यासाठी सभासदांचे लक्ष लागून होते. चंद्रमा कार्यालयाबाहेर सकाळपासून मोठी गर्दी झाली होती; मात्र निकाल बाहेर यायला रात्र झाली. आघाडी, निवड यावर गर्दीतले समर्थक जोरदार जल्लोष करत होते.
भीमाशंकर पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गटातून किरण आहेर राजेंद्र सांडभोर, किरणशेठ मांजरे, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, समीर आहेर, दिनेश ओसवाल, राहुल तांबे पाटील, विद्यमान उपाध्यक्ष अरुण थिगळे, सागर पाटोळे, दत्तात्रय भेगडे, महिलांमधून विजयाताई शिंदे आणि ओबीसीमधून अविनाश कहाणे..
परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गटातून गणेश थिगळे, विनायक घुमटकर, महिलांमधून अश्विनीताई पाचारणे, भटक्या विमुक्तमधून रामदास धनवटे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मतमोजणी केंद्रातून जाताना सर्वच उमेदवारांनी पारंपरिक वाद्य, डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या. अनेकांनी जेसीबीने गुलाल उधळला.