जांबे ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम नोंदणीसाठी बेकायदेशीररित्या ‘वसुली’
![Illegal 'recovery' for construction registration in Jambe Gram Panchayat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/8238d4b8-7be6-43a6-bbf6-1f246f0ed9ee.jpg)
- सर्वसामान्य नागरिकांची होतेय फसवणूक अन् पिळवणूक
- खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीचे अनूप गायकवाड यांची तक्रार
पिंपरी । प्रतिनिधी
जांबे ग्रामपंयात कार्यालयात घर नोंदणीसाठी गेल्या नागरिकांकडून पैशांची वसुली केली जात आहे. वसुलीच्या पापात ग्रामपंचायत विद्यमान पदाधिकारी आणि ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक सहभागी आहेत. याबाबत तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनुप गायवाड यांनी केली आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मु. पो. जांबे (ता. मुळशी, जि. पुणे) हे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत वेगाने विकसित होणारे गाव आहे. सध्यस्थितील पुणे प्रदेश विकास महानगर प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या हद्दीत समाविष्ट असलेल्या जांबे गावात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या कामगार- कष्टकऱ्यांनी घरे बांधण्यासाठी भूखंड खरेदी केले आहे. त्यावर बांधकाम झाल्यानंतर संबंधित नागरिक घरांची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जातात. परंतु, तिथे गेल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत नोंद करण्यासाठी लाख ते दीड लाख रुपयांची मागणी केली जाते, अशा अनेक तक्रारी आहेत.
ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम केल्यानंतर संबंधित नोंदणी करणेबाबत लागणारी कागदपत्रे पूर्तता केल्यानंतर २१ दिवसांत कागदोपत्री रितसर नोंद होणे अपेक्षीत आहे. परंतु, तसे न होता बेकायदेशीरपणे पैसे वसुली केल्यावरच नोंद केली जात आहे. सर्वसामान्य नागरिक पै-पै जमा करून घरे बांधतात. पण, घर नोंदणीसाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरनोंदणीसाठी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जातात. त्यावेळी पंचायतमधील ग्रामसेवक संबंधित नागरिकाला ग्रामपंचायतमधील एका पदाधिकारी यांच्याकडे पाठवतात. व संबंधित पदाधिकार्याच्या खासगी कार्यालयातून पैशाची वसुली केली जाते. त्यानंतरच ग्रामसेवक व पदाधिकारी संगनमाताने पैसे वसुली करुन नोंद घातली जाते.
गावातील सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या प्रकरणात आपण लक्ष घालावे. तसेच, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी आमची मागणी आहे. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून आपण मुक्तता द्याल आणि न्याय मिळवून द्यावा, असेही अनुप गायकवाड यांनी म्हटले आहे.