पत्नीवर खुनी हल्ला करून पती पोलिसात हजर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/dehuroad-murderer-attack.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पत्नीवर धारदार हत्याराने वार करून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पती पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 28) सकाळी अकरा वाजता आदर्शनगर, देहूरोड येथे घडला.
अमोल थोरात (वय 26, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी 26 वर्षीय पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती फिर्यादी महिलेला दारू पिऊन त्रास देत असे. त्यामुळे मागील 15 दिवसांपूर्वी फिर्यादी देहूरोड येथे माहेरी येऊन राहत होत्या. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी पुन्हा दारू पिऊन फिर्यादी यांच्या माहेरी आला. त्याने धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर, पोटात भोकसून गंभीर जखमी केले.
यानंतर पती अमोल चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. त्याने पत्नीवर खुनी हल्ला केल्याची कबुली पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.