वायसीएमच्या वैद्यकीय विभागप्रमुख,अधिष्ठात्यांना 10 लाखांपर्यंत वैद्यकीय खरेदीचे अधिकार
![Head of Medical Department of YCM, the authority to purchase medicine up to Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ycm-photo.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे आणि सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना आता उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधे खरेदी करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. वैद्यकीय उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधे खरेदीसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे वित्तीय अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
वैद्यकीय विभाग आणि त्याअंतर्गत रुग्णालये व दवाखाने तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यात येते. दहा लाख आणि पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार यापूर्वी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना प्रदान केले होते. परंतु या अधिकाऱ्यांना दिलेले हे खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. तसेच यापुढे ही खरेदी मध्यवर्ती भांडार विभाग, मुख्य कार्यालयामार्फत करण्यास 1 नोव्हेंबर 2017 रोजीच्या आदेशानुसार मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका आस्थापनेवरील विविध विभागांसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार, नव्याने विभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वैद्यकीय विभागाकरिता सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेचे अधिष्ठाता डॉ.राजेश वाबळे यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार डॉ. वाबळे यांच्या कार्यकक्षेत वायसीएम रुग्णालयाचे कामकाज आहे. तर, डॉ. गोफणे यांच्या कार्यकक्षेत सर्व महापालिका रुग्णालये आणि सर्व दवाखान्यांचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
त्यामुळे या विभागप्रमुखांना रुग्णालयीन अत्यावश्यक तातडीच्या कामकाजाकरिता अधिकार प्रदान करणे आवश्यक आहे. या रुग्णालय आणि आणि दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करण्याचे अधिकार डॉ. वाबळे आणि डॉ. गोफणे यांना देण्यात आले आहेत.