विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ करून माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी करत छळ
पिंपरी l प्रतिनिधी
सासरच्या लोकांनी विवाहितेला बंगला, गाडी पाहून आपल्या घरात आली असे म्हणत माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी (दि.19) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, नणंद, दिर, जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 जून ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाल्हेकरवाडी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पतीचा आंतरजातीय विवाह झाला आहे. फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून ‘ही बंगला, गाडी पाहून आपल्या घरात आली आहे. हिला दुसरा कोणी भेटला नसता. माझ्या मुलाला फसवले आहे. अवदसा माझ्या पोराच्या जीवावर उठली. फुकट आली घरात’ असे म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. ‘तुझ्या माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. नाहीतर घरात राहू नको’ असे म्हणून आरोपींनी विवाहितेला घरातून हाकलून दिले. आरोपींनी विवाहितेचा मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ करून जातीवाचक शिवीगाळ केली. पतीने फिर्यादिवर वेळोवेळी जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.