गुटखा विक्री प्रकरणी शहरात तीन ठिकाणी छापे; दहा लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी l प्रतिनिधी
भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुटखा विक्री प्रकरणी तीन कारवाया केल्या आहेत. तिन्ही कारवायांमध्ये दहा लाख 82 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
असिफ रशीद शेख (वय 26), रियाज अजीज शेख (दोघे रा. देहूरोड) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
आरोपी असिफ याने आरोपी रियाज याच्या सांगण्यावरून एका कार मध्ये दोन लाख 27 हजार 980 रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला साठवून त्याची विक्रीसाठी वाहतूक केली. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून असिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कार, गुटखा, मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख 33 हजार 980 रुपयांचा ऐवज जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
नाशीर युनुस मुन्सी (वय 47, रा. पिंपरीगाव) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्क्ल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार किशोर पढेर यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी नाशीर याने त्याच्या घरी एक लाख 16 हजार 465 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी दुपारी नाशीर याच्या घरावर छापा मारून कारवाई केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
सुब्रता सचिन बिश्वास (वय 38, रा. वाकड), रमेश (रा. कोथरूड पुणे) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मनोज गोसावी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी सुब्रता गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता गुटखा विक्रीसाठी मोहननगर, बाणेर येथे आला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. सुब्रता याच्याकडून पोलिसांनी 32 हजार 55 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.