चऱ्होलीच्या तापकीर दाम्पत्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरव
![चऱ्होलीच्या तापकीर दाम्पत्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरव](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Image-2021-11-21-at-5.11.15-PM.jpeg)
- कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याची घेतली दाखल
- चऱ्होलीतील अबालवृद्धांकडून सचिन व साधना तापकीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
पिंपरी | प्रतिनिधी
कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत चऱ्होली येथील नगरसेविका साधना तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर या दाम्पत्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात चऱ्होली परिसरातील गोरगरीब- कष्टकरी नागरिकांच्या मदतीसाठी तापकीर दाम्पत्याने पुढाकार घेतला. त्याची दखल विविध सामाजिक संस्था- संघटनांनी घेतली. त्यामुळे ‘कोविड योद्धा’ म्हणून तापकीर दाम्पत्याचा ठिकठिकाणी सन्मान होत आहे.
नगरसेविका साधना तापकीर म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणे, हे आपले कर्तव्य आहे. भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दीड- दोन वर्षांत आम्ही विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. कोविड किट वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, मोफत कोविड चाचणी, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर बेड उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याची दखल घेत आम्हाला राज्यपाल यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामुळे सामजिक हितासाठी आणखी सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- चऱ्होलीत ६ हजार ५० नागरिकांना मोफत लसीकरण…
कोविड काळात लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर आणि नगरसेविका साधना तापकीर यांनी प्रभागात मोफत लसीकरण मोहीम राबवली. त्याला सर्वसामान्य नागरिक, सोसायटीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे तब्बल ६ हजार ५० नागरिकांना मोफत आणि सुलभपणे लसीकरण करून घेता आले. पिंपरी- चिंचवडमधील एखाद्या नगरसेवकाने आपल्या प्रभागात एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण मोहीम राबविल्याची हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे नगरसेविका तापकीर आणि सचिन तापकीर यांच्या कार्याबद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.