GOOD NEWS : महापालिका सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १६०० सफाई कामगार महिला कंत्राती पद्धतीने साफसफाई आणि इतर विविध प्रकारची कामे करतात. त्यांना दिवाळी निमित्त ८.३३ टक्के बोनस आणि कोविड काळात आपत्ती परिस्थितीत सेवा दिल्याबद्दल ९ हजार ५०० रुपये कोविड भत्ता मिळणार आहे, अशी माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली.
याबाबत नुकतीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे आणि ठेकेदार उपस्थित होते.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने साफसफाई कामगार महिलांच्या प्रश्नावरती पिंपरी चिंचवड महापालिके समोर आंदोलन करण्यात आले होते. तसेच पंचायत वतीने सतत पाठपुरवठा करण्यात आला. या आंदोलनास आज यश आले असून महिलांची दिवाळी बोनस आणि कोविड काळात दिलेल्या सेवेबाबत विशेष भत्ता मिळणार आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली असून या बाबत महिलांनी आनंद व्यात करत, एकमेकींना पेढे भरवत आनंद साजरा केला.
ही चांगली सुरवात असून पुढील काळात महिलांना कायम करण्यासाठी आणी त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरवठा करणार आहे. त्यांचे इतर विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठीचा लढा सुरू राहिल, असे बाबा कांबळे म्हणाले.
यावेळी बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे, मधुरा डांगे, सविता लोंढे , मंगल तायडे, कांताबाई कांबळे, संगीता जानराव, प्रमिला गजभारे, अरुणा पवार, अनिता सावळे, अजय लोंढे, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.




