गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा
पोलिसांनी केले ७२ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त
पिंपरी : गॅस चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बावधन बुद्रुक येथे सिद्धनाथ गॅस एजन्सीवर ही कारवाई केली. दादासाहावे अर्जुन श्रीनामे (३१, रा. बावधन बुद्रुक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनामे याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून चार किलो वजनाच्या लहान सिलिंडरमध्ये चोरून गॅस काढला. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना त्याने धोकादायकपणे कृत्य केले. तसेच, चोरुन काढलेल्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत श्रीनामे याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच, त्याच्या ताब्यातून ७२ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.