संत साई स्कूलमध्ये ‘बाप्पा मोरया’
शिक्षण विश्व: संत साई स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये याही वर्षी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगासह पारंपरिक वाद्यांच्या साथीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. “वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ” या मंगल श्लोकाच्या घोषात ओमकार स्वरूप गणपती बाप्पांचे शाळेत आगमन झाले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चार आणि पूजन करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी विशेष मेहनत घेण्यात आली होती. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाने उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
संत साई इंग्लिश स्कूल ही केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातही आपला ठसा उमठवणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवस गणेशोत्सवाचे आयोजन केले. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दररोज सकाळच्या आरतीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते आरती केली जाते.
हेही वाचा : ऑनलाइन मालमत्ता कर भरल्यास ४ टक्के सवलत!
शाळेतल्या विद्यार्थी सायली नितीन शिंदे, पायल मसरकल, नेहा मुनडकर, शुभम बिरादार, प्रगती बालघरे, प्रसाद सोमवंशी, प्रिया बारणे, अश्विनी दफळ, विजय तनपुरे यांच्या हस्ते आरती पार पडली.
प्रत्येक दिवशी आरतीनंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे मनपूर्वक स्मरण केले.
उत्सवाच्या निमित्ताने शाळेने सामाजिक भान ठेवत गरजू संस्थांना मदत केली. तसेच, गणेश अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पाचव्या दिवशी विसर्जन सोहळ्यादिवशी संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, संचालिका सुनीता ढवळेश्वर आणि विश्वस्त ओमप्रकाश मसरकल यांच्या उपस्थितीत आरती पार पडली.
यावेळी ढवळेश्वर यांनी संस्कारमूल्य शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती श्री गणेशाकडे सर्वांसाठी सुख, शांती, समृद्धी आणि विद्येचे वरदान मागण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया”, “पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांनी झाला. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना निरोप दिला. या सोहळ्यात शाळेच्या उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, संजय अनार्थे, स्वाती मोघे, भारती ढवळेश्वर, आरती मुट्टगीशेट्टर, कोमल वाबळे, रिया पोतदार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.