गणेशोत्सव: टाकाऊ वस्तूंमधून साकारला सुंदर गणपती
केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगरच्या चिमुकल्यांची कौतुकास्पद कलाकृती

पिंपरी-चिंचवड: केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री स्कूल, कृष्णानगर ब्रांच येथील दोन ते सहा वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेचे व कलागुणांचे प्रत्यंतर देत टाकाऊ वस्तूंमधून सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती साकारली.
झाडू, रबर, काठ्या, बाहुली, कापूस, खराब झालेले थर्माकोल यांसारख्या घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून मुलांनी गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमातून ‘वेस्ट टू बेस्ट’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णानगर प्रभागातील नागरिकांसाठी करण्यात आले. उपस्थित सर्व पालक व नागरिकांनी चिमुकल्यांच्या कलाकृतींचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन सौ. कीर्ती मारुती जाधव, तसेच संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होता. सौ. जाधव यांनी आपल्या भाषणात लहान वयातच मुलांमध्ये निर्माण होत असलेली कलात्मक जाणीव आणि सामाजिक भान यावर प्रकाश टाकला. हा उपक्रम केवळ मुलांच्या हस्तकलेचे प्रदर्शन न राहता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा एक प्रेरणादायी मार्ग ठरला.
“चिमुकल्यांमधील सृजनशीलता आणि सामाजिक भान विकसित करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेल्या या सुंदर गणेशमूर्ती फक्त कला नाही, तर पर्यावरणप्रेमाचेही प्रतीक आहेत. अशा उपक्रमांमधून मुलांचा सर्वांगीण विकास साधता येतो.”
— सौ. कीर्ती मारुती जाधव, चेअरमन.