वकील असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे बनवून फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केल्याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा
![Fraud charge against two for registering a flat by forging documents claiming to be a lawyer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/fraud-3.jpg)
पिंपरी चिंचवड | वकील असल्याचे सांगून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 25 येथे बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे सात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून व्यक्तीची 13 लाख आठ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 18 आणि 19 मे 2021 या दोन दिवसात घडला आहे.प्रसन्न शिरुडकर (वय 41), शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय 40, दोघे रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अमित दत्तात्रय घुले (वय 42, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुले त्यांच्या ओळखीचे अॅड. पठाण यांना भेटण्यासाठी गेले असता तिथे त्यांची आरोपींसोबत ओळख झाली. आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवून तुमचे दस्त करून देतो, असे सांगून घुले यांचा विश्वास संपादन केला.
प्रसन्न शिरुडकर हे वकील नसताना त्यांनी घुले यांना तसे सांगितले. फिर्यादी यांचे मांजरी बुद्रुक येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंग मधील 13 फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगितले. त्यासाठी घुले यांच्याकडून सातबारा उतारा, आठ (अ) उतारा, फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेतले. सात फ्लॅटचे 18 आणि 19 मे या दोन दिवसात दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 25, दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्र बनवून त्याचा वापर करून रजिस्ट्रेशन करून फिर्यादी घुले यांची 13 लाख आठ हजारांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.