महिलेचे १२ लाखांचे दागिने परस्पर गहाण ठेऊन फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/cheating-crime.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेच्या मैत्रिणीने महिलेकडून तिचे ३० तोळे दागिने घेतले. ते दागिने महिलेने परस्पर दोन सोनारांकडे गहाण ठेवले आणि नऊ लाख १० हजार रुपये घेतले. त्या पैशांचा अपहार करून महिलेची फसवणूक केली. ही घटना एप्रिल २०२० ते जून २०२१ या कालावधीत बिना स्कुल आकुर्डी येथे घडली.
याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्यादी दिली असून त्यानुसार गुरुदेवनगर, आकुर्डी येथे राहणा-या ३४ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे ३० तोळे दागिने त्यांची मैत्रीण आरोपी महिलेला विश्वासाने दिले. त्यामध्ये सोन्याचे गंठण, सोन्याची वेढणी, शॉट गंठण, बांगड्या, नेकलेस, कानातील टॉप्स, अंगठी, मोहनमाळ, दोन चेन असे दागिने होते. १२ लाखांचे दागिने आरोपी महिलेने घेतले आणि ते शुभम ज्वेलर्स निगडी आणि अंबिका ज्वेलर्स आकुर्डी यांच्याकडे बेकायदेशीरपणे गहाण ठेवले. त्याबदल्यात नऊ लाख १० हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला. फिर्यादी यांनी दिलेले सोन्याचे दागिने परत मागितले असता ते परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.