ओटास्कीम येथून चार किलो गांजा जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/ganja-arrest.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 14) दुपारी बारा वाजता ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीकडून एक लाख 18 हजारांचा चार किलो गांजा जप्त केला आहे.
अर्जुन सखाराम खाडे (वय 50, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे. त्याने सावळा शिवाजी खाडे (रा. ओटास्कीम, निगडी) याच्याकडून हा गांजा आणल्याने त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन खाडे याने त्याच्या घरात विक्रीसाठी गांजा साठवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुनच्या घरी शनिवारी दुपारी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांना चार किलो 136 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख 18 हजार 400 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करत अर्जुनला अटक केली. अर्जुन याने हा गांजा सावळा खाडे याच्याकडून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सावळा खाडे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.