पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चार अपघात : एकाचा मृत्यू, पाचजण जखमी
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, चाकण येथे एक तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे एक अपघात झाला. या चार अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भावेश दिलीप नहीरे (वय 27, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मित्र अनिकेत रामकृष्ण भावसार (वय 27), सुरज राजेंद्र घरटे (वय 27) हे दोघेजण रात्री जेवणासाठी जात असताना बेंगलोर-मुंबई महामार्गावर ताथवडे येथे एका ट्रकने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे फिर्यादी यांच्या मित्राची गाडी ट्रकला धडकली. यामध्ये अनिकेत भावसार याचा मृत्यू झाला. तर सुरज घरटे गंभीर जखमी झाला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाताचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. अमर आनंदा पाटील (वय 41, रा. वाकड) आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. अमर पाटील यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका कारने पाटील यांच्या कारला धडक दिली. यात पाटील आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.
मोहम्मद जान अन्सारी (वय 52, रा. गवतेवस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद सद्दाम हुसेन (वय 23) पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना कोअर हॉस्पिटल समोर, चाकण येथे अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात मोहम्मद हुसेन गंभीर जखमी झाला आहे.
मोशी प्राधिकरण येथे एक अपघात झाला. ज्ञानेश्वर मुरलीधर चाटे (वय 34, रा. डुडुळगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचा मेहुणा दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला सुप्रित गौडा मठ्ठा याने त्याच्या दुचाकीने जोरात धडक दिली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.