कोरोना बाधितांची संख्या घटल्याने पिंपरी-चिंचवडमधील पाच कोविड केअर सेंटर बंद
![Five Covid Care Centers in Pimpri-Chinchwad closed due to declining number of corona sufferers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/pcmc-16.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद केले आहेत. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद केले आहे.
जम्बोचे संचालक डॉ. संग्राम कपाले म्हणाले, ‘‘पहिल्या कोरोना लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे आठशे बेडचे जम्बो रुग्णालय सप्टेंबरमध्ये सुरू केले होते. त्यानंतर पाहिली लाट ओसरल्यावर १ जानेवारीपासून रुग्णालय बंद केले होते. वायसीएम रुग्णालयातून रेफर केलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. थेट पद्धतीने रुग्णाला दाखल करून घेतले जात नाही. दोन दिवसांपासून नवीन रुग्ण भरती करणे बंद केले. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून रुग्णसंख्येत घट झाली. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांपासून नवीन रुग्ण भरती करून घेणे बंद केले आहे. सध्या जम्बोत दीडशे रुग्ण दाखल आहेत.’’
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘‘शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. महापालिकेचे नवीन आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालय लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यामुळे जम्बोमध्ये नवीन रुग्ण भरती करणे बंद केले असून जेवढे रुग्ण आहेत, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केले जात आहेत. रुग्ण बरे झाल्यानंतर परिस्थिती पाहून जम्बो बंद करण्याबाबत आयुक्त निर्णय घेतील. पाच कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. घरकुलमधील चार आणि मोशीतील ट्रायबल हॉस्टेलमधील एक, असे पाच कोविड सेंटर बंद केले.’’